“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 05:47 PM2024-11-30T17:47:00+5:302024-11-30T17:48:00+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: कर्नाटक, झारखंड, लोकसभेला ईव्हीएमवर दोषारोप केले नाहीत. आता नैतिकता म्हणून विरोधकांचे निवडून आलेले आमदार राजीनामा देणार का, असा सवाल भाजपा नेत्यांनी केले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
महायुतीत कोणत्याही पदासाठी रस्सीखेच नाही. हे सरकार महायुती म्हणून चालवणार आहोत. महायुतीतील प्रत्येक पक्ष एक नंबर आहे. महायुतीत विसंवाद होईल, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी नेहमीच दरे गावी जातात. एकनाथ शिंदे यांना गावी गेल्यावर समाधान, शांतता आणि आनंद मिळतो. याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकवेळी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केलेला आहे. महायुती अभेद्य राहण्याचा विचार केलेला आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या आणि महायुतीच्या हिताचा असेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम
शिवसेना फोडल्यानंतर भाजपासोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांना मेहेरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिले, अशा आशयाची टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना, संजय राऊत यांच्या अशाच बडबडीमुळे त्यांच्या पक्षाचा ऱ्हास झाला आहे. तरीही संजय राऊत यांच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि राहिलेल्या पक्षाला मातीमोल करण्याचा संजय राऊतांचा विचार दिसत आहे. एकनाथ शिंदे कोणाच्या उपकारावर आणि मेहेरबानीवर जगणारा नेता नाही. पंतप्रधान जेव्हाही महाराष्ट्रात आले, तेव्हा एकनाथ शिंदे यांना आपलेपणाची वागणूक दिली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनीही भावाप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम केले आहे. महायुतीचे सरकार परत येण्यात एकनाथ शिंदे यांनी भूमिका किती महत्त्वाची आहे, हे सगळ्यांनाच ज्ञात आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवारांनी ईव्हीएमबाबत केलेल्या आरोपांवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, हा रडीचा डाव आहे. आपण जिंकलो की, ईव्हीएम चांगले. कर्नाटक, झारखंड, लोकसभेला तुम्हाला यश मिळाले, तेव्हा ईव्हीएमचा काही प्रॉब्लेम नाही, ईव्हीएमवर बोंबाबोंब केली नाही. आता दारूण यश आले, म्हणून ईव्हीएमवर दोष देणे योग्य नाही. ईव्हीएमवर दोष देत असाल, तर तुमचे निवडून आलेले आमदार राजीनामा देणार आहेत का, मग नैतिकता असेल, तर आधी राजीनामा द्यावा आणि मगच बॅलेटची मागणी करावी. शरद पवार अतिशय धूर्त राजकारणी आहेत. आता शरद पवारांचे आमदार त्यांच्याकडे टिकतील की नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. म्हणूनच ईव्हीएमवर बोलून आमदार टिकवण्याची केविलवाणा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.