“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:11 PM2024-12-03T19:11:19+5:302024-12-03T19:15:22+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटू लागली आहे. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार भाजपा नेत्यांनी केला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? किती आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध होणार? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीची बैठक होणार नसल्याने अनुत्तरित राहत आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरूच आहे. अशातच उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला जबर हादरा बसला. अवघ्या २० जागाच शिवसेना ठाकरे गटाला जिंकता आल्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केली असून, माजी नगरसेवकांना आणि नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत बीएमसी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. या टीकेचा भाजपा नेते प्रसाद लाड यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते
प्रसाद लाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आता उफाळलेले प्रेम चार ते पाच वर्षांपूर्वी उफाळले असते, तर कदाचित एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून कधी बाहेर पडले नसते. ज्या पद्धतीने कार्यकर्ते, आमदारांचा अपमान, मंत्र्यांचा अपमान, एकनाथ शिंदे यांचा अपमान सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केला, त्यामुळे हिंदुत्वाचा बंड झाला आणि खरी शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोणता विषय राहिलेला नाही. कार्यकर्त्यांना जागे ठेवायचे असेल, तर बैठका घ्यावा लागतात. परंतु, आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, या शब्दांत प्रसाद लाड यांनी निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे. उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा. भाजपाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसे आपणही तळागाळात जाऊन काम केले पाहिजे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू, तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा. १८ निरीक्षकांना नेमून प्रत्येकी १२ प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करा. बीएमसी निवडणुकांपर्यंत भाजपा एकनाथ शिंदेंना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजपा आपले खरे रुप दाखवेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चा आव आणून त्याखाली भाजपाने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रके वाटण्यापुरती होती. सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपाची मोठी शक्ती आहे. भाजपाला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. परंतु, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई महापालिका जिंकायचीच आहे. लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावले जाणार आहे. मुंबईतील गट प्रमुखांचेही शिबिर घेणार आहे, अशी माहिती, सूचना आणि आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे सांगितले जात आहे.