“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:06 PM2024-12-03T20:06:13+5:302024-12-03T20:09:58+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर शिवाजी पार्कवर बोलताना राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरी महायुतीला मुख्यमंत्र्यांची निवड करून नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालांनंतर प्रथमच यावर भाष्य केले आहे.
या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडणून आला नाही. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह सगळे उमेदवार पराभूत झाले. तसेच एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तर अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी गेले. मनसेचे मताधिक्य कमी झाले असून, पक्षाच्या मान्यतेचे पुढे काय होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जयंती दिवसाचे औचित्य साधून मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात रमाकांत आचरेकर सरांचे एक स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे अनावरण आचरेकर सरांचा सर्वांत आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती.
निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते
क्रिकेटमध्ये जसे सगळे बदलत गेले, तसेच आमच्या राजकारणात बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरने आऊट दिल्यावर तो निर्णय थर्ड अंपायर नेता येतो. मला वाटते की, गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते. मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करू शकलो नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच हे स्मारक या आधीच व्हायला हवे होते. कारण रमाकांत आचरेकर सर म्हटले की, सचिन तेंडुलकर हे नाव समोर येते. मला वाटत नाही की, भारतात रमाकांत आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू तयार केले तेवढे एखाद्या कोचने तयार केले असतील. ज्यावेळेस आपल्या देशात, राज्यात फ्लाय ओवर्स, महामार्गासारख्या अनेक गोष्टी तयार होत असताना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना अशा लोकांची नावे दिली पाहिजेत. आपल्या इथे असलेला सर्वांत मोठा रस्ता हा महात्मा गांधींच्या नावाने आहे. मात्र महात्मा गांधींचे जे गुरु आहेत गोपाळ कृष्ण गोखले तो आमचा गोखले रोड आहे. गुरु नावाची काय व्यक्ती असते? काय परंपरा असते? ही गोष्ट आपल्याकडे नाहीच, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.
सचिन तेंडुलकर न चुकता नमस्कार करायला, आशीर्वाद घ्यायला यायचे
दहावी-बारावीचे विद्यार्थी माझ्याकडे येतात, त्यावेळी त्यांना विचारत असतो की, पुढे काय करायचे आहे? त्यावर ते वेगवेगळी उत्तर देतात. मात्र एकही विद्यार्थी असे म्हणत नाही की, मला शिक्षक व्हायचे आहे. देशात मुलांना शिक्षक व्हावेसे वाटत नाही, या देशाचा पुढे काय होईल, हे कळत नाही. रमाकांत आचरेकर सरांच्या घरी सचिन तेंडुलकर दरवर्षी न चुकता नमस्कार करायला आणि आशीर्वाद घ्यायला यायचे. आमच्याकडे गुरुपौर्णिमा ही केवळ मोबाइल पुरती आणि मेसेज पुरती मर्यादित राहिली आहे. गुरु नावाची जी व्यक्ती असते ती जोपासणे महत्त्वाचे आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
दरम्यान, रमाकांत आचरेकर सरांचे योगदान एवढे मोठे आहे की, त्यांच्या नावे एखादा स्मारक व्हावे, काहीतरी मोठे कार्य व्हावे, असे मनापासून वाटत होते. त्यासाठी अनेक लोकांसोबत बोललो होतो. आचरेकर सरांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे भरपूर झाले आहेत. त्यामुळे वेगळी कल्पकता वापरून स्मारकाऐवजी जिथे स्टम्प्स आहेत, ग्लोज आहे, बॅट-बॉल आहेत, यासह आचरेकर सरांची सरांची टोपी आहे. ती कॅप आचरेकर सरांची खास ओळख होती, त्याचे स्मारक केले, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.