“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:25 IST2024-12-01T13:21:59+5:302024-12-01T13:25:43+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंना शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून यावे लागेल, अशा चिंतेत अनेक लोक आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sanjay raut criticized governor and former cji dy chandrachud for situation in the state | “राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत

“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएमवर टीका करत असून, अनेक उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते आजारी आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही काही वेड वाकडे बोलू नका, त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. हाताला पट्टी लावून बसले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांना ते भेटले नाहीत. म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा. शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावे लागेल अशा चिंतेत अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे डॉक्टर गेले होते असे मी वृत्तपत्रात वाचले. त्यांना डॉक्टर यांची गरज आहे की, मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत? अशी खोचक विचारणा संजय राऊत यांनी केली. 

राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले आणि म्हणाले की, ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल. हे सांगायला ते काय राज्यपाल आहेत का? मूळात त्यांना हे अधिकार आहेत का आणि हे अधिकार त्यांना कोणी दिले? राज्यपालांनी त्यांना सांगितला आहे का? राज्यपालांनी बावनकुळेंना कळवले आहे का? एकीकडे हे महायुतीवाले सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत आणि बावनकुळे पाच तारखेची घोषणा करत आहेत. मला एक कळत नाही हे लोक घाबरतात का? राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला चंद्रचूड जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक पेचाला जबाबदार आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आहे. २६ नोव्हेंबर रोजी नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे होते. महायुतीच्या जागी महाविकास आघाडी असती तर एव्हाना या लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महायुतीला बहुमत मिळून अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे तरी त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेले नाही. भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता ठरलेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतके मोठे बहुमत आहे तरी विधिमंडळ नेता निवडता आलेला नाही. ते सरकार स्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. इतकेच काय तर सरकार स्थापनेसाठी कोणी राज्यपालांना भेटले नाही आणि राज्यपाल हे सगळे चालू देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sanjay raut criticized governor and former cji dy chandrachud for situation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.