भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:58 PM2024-11-27T14:58:01+5:302024-11-27T15:00:58+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यात एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक लागतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आधीही होते आणि आताही आहेत, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आता पाच वर्षांपूर्वी भाजपाने जे उद्धव ठाकरेंसोबत केले, तेच आता एकनाथ शिंदेंसोबत करणार का, असा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी थेट शब्दांत स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
महायुतीत लढताना जागा कोणाच्या कितीही आल्या तरीही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असा शब्द भाजपाने दिला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर अनेकदा दगाफटका केल्याचा, पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाची बॉडी लँग्वेज बदलली आहे, एकनाथ शिंदे यांना साइडलाइन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यावरून उद्धव ठाकरे जे आरोप करत होते, ते खरे होते, असे वाटते का, याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
भाजपा फसवते, दगाफटका करते, युज अँड थ्रो करते
ही चर्चा सुरू आहे, त्यात अजिबात तथ्य नाही. भाजपा आता बॉडी लँग्वेज बदलेल, असे वाटत नाही. भाजपा फसवते, दगाफटका करते, युज अँड थ्रो करते, हे लोकांनी गृहीत धरले आहे. परंतु, तसे नाही. अशा प्रकारची बिरुदे भाजपा स्वतःला लावून घेणार नाही. एकदा कमिंटमेंट दिली की, ती पूर्ण केली जाते, अशी प्रतिमा भाजपालाही तयार करायची आहे. सुनील तटकरेंना वेळ मिळाला आणि आम्हाला मिळाला नाही, यावरून काही तर्क काढण्यात अर्थ नाही. तसेच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन शिवसेनेला बाहेर बसवतील, अशा चर्चा निरर्थक आहेत. असे काहीही होणार नाही. परंतु, असे झाले, तर भाजपालाच ते जास्त त्रासदायक ठरेल, असे सूतोवाच करत भाजपावाले अशा नीती अवलंबणार नाही. एवढा समंजसपणा भाजपा दाखवेल, अशी अपेक्षा
दरम्यान, न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यात एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक लागतो. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे कुणालाही कळत नाही. राजकारण जोपर्यंत एखादी गोष्ट निश्चित होत नाही, तोपर्यंत ज्या काही चर्चा, दावे सुरू असतात, त्याचा काहीही उपयोग नसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आधीही होते आणि आताही आहेत. जोपर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे रेसमध्ये आहेतच, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.