“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 07:24 PM2024-12-04T19:24:47+5:302024-12-04T19:25:34+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधकांना अहंकाराचे फळ मिळाले, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. केंद्रापासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत भाजपातील हजारो लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच शुभेच्छांचा वर्षावर केला. यातच सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोद दिले. एकमताने सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली. एकाही व्यक्तीने वेगळे मत व्यक्त केले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील. महायुतीच्या सरकारमध्ये कोण-कोण शपथ घेणार, हा अधिकार देवेंद्र फडणवीस यांचा आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईल या वाक्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. मात्र, ते पुन्हा आले. खरे तर अहंकार हा असाच जात असतो. शेवटी विरोधकांना अहंकाराचे फळ मिळाले. सच परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, असे सांगत त्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.