“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 06:39 PM2024-11-25T18:39:12+5:302024-11-25T18:41:21+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा होईल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २० जागांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडीत आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा असेल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे संयुक्त नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना भास्कर जाधव यांनी मन की बात बोलून दाखवली. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी निवडून आले आहेत. विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे तरी पण हा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना पुरून उरेल. गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली असून सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरे तर माझे म्हणणे होते की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करावे पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि त्यामुळे गटनेता म्हणून यापुढे काम करेन, असे भास्कर जाधव म्हणाले.
मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल
महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा होईल. त्यात जर मला ही जबाबदारी दिली तर मला नक्कीच विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांशी संवाद साधताना ते फडण‘वीस’ असले तरी आपण २० आहोत आपण पुरून उरु, असे म्हटले आहे, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
दरम्यान, सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावे. सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्षनेते पदासाठी विचार व्हायला हवा. मात्र, हा सगळा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर होईल. मंत्रिमंडळ स्थापन होईल शपथविधी होईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. विधानसभा अध्यक्षांना आम्ही विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीचा एकत्रित मिळून व्हावा यासाठी विनंती करू, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.