पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:10 PM2024-11-25T15:10:53+5:302024-11-25T15:14:37+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे एक महत्त्वाची बैठक झाली असून, यात काही मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. यातच ऐतिहासिक बंडखोरीतून मोठा धडा घेत ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागाच मिळाल्या. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २० जागांपर्यंत मजल मारता आली. विधानसभा सभागृहात विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला २९ उमेदवार निवडून आणावे लागतात. परंतु, महाविकास आघाडीची झालेली धूळधाण पाहता तेही आता दृष्टिपथात असल्याचे दिसत नाही. यातच आता ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती
या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते. पैकी केवळ २० ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळाले. यानंतर मातोश्री येथे सर्व नवनिर्वाचित २० आमदारांची एक बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते निवडण्यात आले. तसेच नवनिर्वाचित २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असून, पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. पक्षफुटीचा मोठा अनुभव घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. तर विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे सभागृह नेते असणार आहेत, याबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली.