“थांबा, सगळे कळेल”; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? अद्यापही सस्पेन्स कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:28 PM2024-12-04T16:28:29+5:302024-12-04T16:29:28+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अद्यापही याबाबत सस्पेन्स कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. परंतु, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर या तीनही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच शपथविधी सोहळ्याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना, एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे, अशी विनंती केली. त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. शिवसेनेच्या आमदारांसह महायुतीतील सगळ्यांची तशीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही?
पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना सत्तेतील सहभागाबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना सायंकाळपर्यंत थांबा. सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आम्ही सर्वजण बसून चर्चा करू, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला बगल दिली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरचा घटनाक्रम पाहता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार करणार की नाही, याबाबत स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मागील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली होती. दिल्लीच्या भेटींमध्येही हीच नाराजी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अद्यापही याबाबत सस्पेन्स कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.