"मनसेने सगळे उमेदवार मागे घेतले तर मी अडून राहणार नाही"; सदा सरवणकरांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:17 PM2024-11-04T12:17:30+5:302024-11-04T12:20:23+5:30
Sada Sarvankar : सदा सरवणकर यांनी मी ठेवलेली अट मान्य झाली तर आपण अडून राहणार नसल्याचे म्हटलं आहे.
Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काही तास उरले असतानाही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. तसेच सदा सरवणकर यांनी मी ठेवलेली अट मान्य झाली तर आपण अडून राहणार नसल्याचे म्हटलं आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात सध्यातरी तिरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर अद्यापही माघार न घेण्यावर ठाम आहेत. मात्र उमेदवारी मागे घेण्याचे काही संकेत देताना सदा सरवणकर यांनी महत्त्वाची एक अट मनसेसमोर ठेवली आहे. मुंबईत महायुतीच्या विरोधातील सर्व उमेदवार मनसे मागे घेणार असेल तर आपण अडून राहणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. पक्ष हितासाठी मी मनसेने महायुतीच्या उमेदवाराविरोधात दिलेले उमेदवार मागे घ्यावेत असा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना दिला होता. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार आणि दादर माहीमधून धनुष्यबाण विधानभवानात जाणं काळाची गरज आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले त्यांचे म्हणणं आहे की, मनसे मुंबईतील महायुतीच्या विरोधातील उमेदवार मागे घेण्यास तयार आहेत. मी जी निवडणूक लढवतो आहे ती वैयक्तिक नाही. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना विचारून आणि मतदारसंघातील भावना समजून घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे की, मी ठेवलेली अट मनसेने मान्य केली तर त्यासंदर्भात मला कार्यकर्त्यांशी बोलण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी चर्चा करुन निर्णय घेणार आहे," असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.
"मुंबईतल्या सगळ्या जागांवरुन महायुतीच्या विरोधातील मनसेच्या सर्व उमेदवारांनी माघार घ्यावी ही माझी अट आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एक एक आमदार वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. मनसेमुळे आमचे उमेदवार पराभूत होणार असतील तर मी ही निवडणूक प्रतिष्ठेची न करता जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी आवश्यक धोरण आणि भूमिका घेणे महत्त्वाचे आहे," असं सरवणकर म्हणाले.
"तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घ्या, त्यांना काय वाटतं असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अनेकवेळा संघटनेच्या हितासाठी आम्ही असा त्याग केलेला आहे. त्यामुळे हा त्याग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आमच्या विरोधातील सर्व उमेदवार मनसे मागे घेणार असेल तर एका आमदारकीसाठी अडून राहणे हे संयुक्तिक होणार नाही. मी माघार घेणार आहे असं म्हटलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भावना तुमच्यापर्यंत कळवल्या आहेत. त्याला सकारात्मक उत्तर कार्यकर्त्यांसह बोलून देणार आहे," असेही सदा सरवणकर यांनी म्हटलं.