Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवारांबाबतचा घोळ पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असूनही अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित आणि जाहीर झाले नव्हते, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसले. तर अनेकांनी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त करत थेट अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला. माहीम मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याचे समजते. या घडामोडींवर सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली.
अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी मनधरणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आपली भूमिकाही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केली आहे. तसेच सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यातच आता समाधान सरवणकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आधीच २५ कोटी दिले आहेत आणि...
अमित ठाकरे म्हणत आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु, समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जावे लागते. अमित ठाकरे भविष्यात नक्की समाजात जातील. अमित ठाकरे यांच्यावर टीका करून काही फायदा नाही. माहीममध्ये पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प बंद आहेत. याचसाठी सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठका झाल्या आहेत. अमित ठाकरे राजकारणात नवीन आहेत. अमित ठाकरे यांना अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. त्या शिकायला त्यांना फार वेळ आहे. आमच्या पाठिंब्याच्या चर्चा या फक्त मीडियातच होत्या. आमचे तर पहिल्या यादीत नाव होते. या मतदारसंघात अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकत आहे. यंदाच्या निवडणुकीत भगवा फडकेल. सदा सरवणकर यांनी माहीमधील अनेक प्रश्न सोडवले आहेत, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, फक्त समुद्रकिनारा साफ करुन होणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनऱ्यासाठी आधीच यासाठी २५ कोटी रुपये जाहीर केले आहेत आणि त्याची कामेही सुरू झाली आहेत, असे समाधान सरवणकर यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. दुसरीकडे, अमित ठाकरे यांना महायुतीने पाठिंबा द्यायला हवा, अशी भूमिका भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मांडली. आता सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.