Join us

“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:40 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही. आताच्या यादीत दुरुस्त होऊ शकते, एखाद्या नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर शिवडी मतदारसंघात अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सुधीर साळवी नाराज झाले आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुधीर साळवी शिवसेनेपेक्षा वेगळे नाहीत. साळवी हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आमचे सहकारी आहेत. त्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुखांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मला वाटत नाही ते रागावले आहेत, इच्छा व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. अजय चौधरी हे ज्येष्ठ आमदार आहेत. सगळा विचार करूनच उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे

वरळी मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मिलिंद देवरा यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी स्वतः आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहावे किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा. एवढीच महत्त्वाची जागा असेल तर थेट जय शाहांनाच उभे करावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

दरम्यान, शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही. आताच्या यादीत दुरुस्त होऊ शकते, एखाद्या नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो. कोणत्याही जागेवर पेच नाही, रामटेक विधानसभा मतदारसंघात आणि सांगोला  मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे तिथे आम्ही निर्णय घेणार आहे, तिथे काय करायचे ते ठरवणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतआदित्य ठाकरेमुंबई विधानसभा निवडणूकवरळी