Join us

मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 12:10 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनीही याबाबत स्पष्ट भाष्य केले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना ९० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढेल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आमचा फॉर्म्युला असा काही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दणक्यात सुरूवात झाली आहे. येत्या २३ तारखेला ॲटम बॉम्ब फुटेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर बोलताना, ॲटम बॉम्ब फुटेल म्हणजे काय करणार? अजून काय करणार?  नरेंद्र मोदी काय त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत का? स्वप्न पहायला ५० खोके लागत नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

मनोज जरांगे यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने महाराष्ट्रात जो संघर्ष सुरू आहे, तो त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, हे मान्य केले पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंघपणे उभा आहे. निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे.  त्यांचा जो लढा आहे तो राजकीय नव्हे , सामाजिक आहे, असे आम्ही मानतो. ती एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे जरांगे यांनी काय आणि कशी भूमिका घ्यावी, याचे मार्गदर्शन आम्ही करणार नाही. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत २५ मतदार संघावर चर्चा करण्यात आली. रात्री १४ मतदार संघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित मित्रपक्षातील उमदेवार देण्यावर चर्चा करण्यात आली. मित्रपक्षाची यादी सकाळी ९ वाजेपर्यंत तरी आली नव्हती. यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाच्या जीवावर निवडणूक लढविता येत नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही. त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदारसंघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून 'मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे', असे लिहून घ्या, असे आवाहन केले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतमनोज जरांगे-पाटील