Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Sanjay Raut News: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्यापही शमला नाही. तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले. यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शब्दांत भाष्य केले.
मविआत ज्या जागांवर तिढा कायम आहे, अशा जागांवर उद्धव सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. नाना पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे वादाच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्धव यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे काही जागा सोडायला आधी तयार झालेही होते, मात्र पटोले यांच्या या पत्रानंतर ते आता जागा न सोडण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधींनी त्यांच्या बैठकीत काही भूमिका मांडली असेल तर...
काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसने योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नाही म्हणून जागावाटपाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी नाराज झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांना ओळखतो. राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत काही भूमिका मांडली असेल, तर त्याला नाराजी म्हणत नाही. तीनही पक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहे. हे राहुल गांधींना माहिती आहे. राहुल गांधींना चर्चा करायची असती तर त्यांनी आमच्या दोन्ही पक्षांची चर्चा केली असती. राहुल गांधी यांच्याबाबत बाहेर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन संजय राऊतांनी केले.
दरम्यान, आम्ही एका जागेची अदलाबदल केली आहे. निवडणूक काळात असा पत्र व्यवहार होत असतो. नाराजी व्यक्त केली याचा अर्थ ते संन्यास घेऊन बाहेर गेले असा अर्थ होत नाही. नाना पटोले यांच्याशी माझा चांगला संवाद सुरू आहे. लेटरबॉम्ब वगैरे हा औपचारिकपणा असतो. मीही जयंतरावांना अनेकदा पत्र पाठवतो. पत्र यासाठी पाठवायचे असते की, आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी एक कागद राहतो. आता आमच्या सगळ्यांचे वय झाले आहे. कागद समोर असला की चर्चा होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.