Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: "अमित शाह खोटे बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटे बोलतो", ही खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका नव्या वादाचं कारण ठरली आहे. व्यापारी वर्गाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राऊतांना भाजपाने घेरलं असून माफीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात जो राजकारणाचा चिखल केला आहे, त्याला जबाबदार अमित शाह, त्यांची व्यापारी आणि खा खा वृत्ती आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी आणि ओरबाडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांत अमित शाह यांच्यासारख्या व्यापाऱ्यांनी जे षड्यंत्र रचले, त्यामुळे महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली आहे, असं टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडलं. मात्र, त्यांच्या या विधानाने व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे. व्यापारी हा खोटारडा असतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या टिप्पणीवर व्यापारी वर्गाकडून आक्षेप घेतला जातोय आणि भाजपानेही त्यावरून संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वीर सावरकर यांच्याबद्दल चांगले शब्द बोलावेत, असे उद्धव ठाकरे काँग्रेस किंवा राहुल गांधी यांना सांगू शकतात का, असे आव्हान देत सत्ता स्थापन करताना आम्ही अन्य कुणालाही संधी देणार नाही, असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सत्ता कुणाला द्यायची किंवा सत्तेपासून कुणाला लांब ठेवायचे, हे अमित शाह ठरवणार नाहीत, तर महाराष्ट्राची जनता ठरवेल. अमित शाह यांनी या महाराष्ट्रातील ४० आमदार विकत घेतले असतील, पण महाराष्ट्रातील १४ कोटी जनता विकत घेतलेली नाही. अमित शाह महाराष्ट्राचे नेते नाहीत. अमित शाह गुजरातचेही नेते नाहीत. अमित शाह देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाहीत."
दरम्यान, अनुच्छेद ३७० ला कुणी विरोध केला नाही. कलम ३७० ला शिवसेनेने कधी विरोध केला नाही. कधी भूमिका मांडल्या असतील. शिवसेनेने पाठिंबाच दिला आहे. अनुच्छेद ३७० हटवून आपण काश्मीरमध्ये काय दिवे लावले? हे सांगा म्हणा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मात्र, त्याचवेळी त्यांनी व्यापारी खोटं बोलतात, असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
संजय राऊतांनी शिवसेनेचे व्यापारीकरण केले
संजय राऊतांनी शिवसेनेचे व्यापारीकरण केले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात फरक आहे. व्यापारी आणि दुकानदार या देशाचे नागरिक आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याने संपूर्ण व्यापारी-दुकानदार वर्गाचा अपमान झाला आहे. दुकानदारांनी संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घ्यावा आणि महायुतीच्या बाजूने उतरावे, असा पलटवार भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.