“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:47 AM2024-11-15T11:47:57+5:302024-11-15T11:48:54+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही. सुरुवातीला शरद पवार आणि माझ्यातच चर्चा झाल्या. पाच वर्ष सरकार टिकवण्याची कमिटमेंट होती, अशी कबुली संजय राऊत यांनी दिली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यातच एकामागून एक गौप्यस्फोट होत असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २५ वर्ष शिवसेनेबरोबर युती असताना तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीस खोटे बोलत आहेत. त्या प्रक्रियेत मी होतो मला माहिती आहे, ते कुठल्याही प्रकारची चर्चा करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितले जात होते. आमचे असे म्हणणे होते की आपले जे ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस सध्या गोंधळलेले व्यक्तिमत्व आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पाच वर्ष सरकार टिकावे अशी आमची कमिटमेंट होती
आमचे सरकार बनत आहे, हे त्यांना माहितीही नव्हते. त्यांना धक्का बसला होता, पडता पडता वाचले, कोसळले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटले होते की, शिवसेना काय करणार? आमच्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, राजकारण शिवसेनेलाही करता येते. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही ते सरकार पाडले. पाच वर्ष सरकार टिकावे अशी शरद पवार आणि आमची कमिटमेंट होती. त्यांना खोटे बोलण्याचा रोग लागलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी नेमके काय ठरवले हे माझ्या इतके कोणाला माहिती नाही. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये. त्यांना काहीच माहिती नव्हते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी काय गौप्यस्फोट केला?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे. भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले, परंतु त्यांच्याकडे बहुमत नव्हते. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शाह, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरले होते, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.