Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतील घटक पक्षांनी एकाच मतदारसंघात दोन उमेदवार दिले आहेत. याबाबत भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत यांनी बारामतीची लढाई महायुतीला सोपी राहिलेली नाही, असे म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या पालख्या वाहाव्या लागणार आहेत, त्यात नवीन काय आहे. ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. त्यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागत आहेत. ते भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
कोण किंगमेकर हे निकालानंतर कळेल
यंदाच्या निवडणुकीत अजित पवार हे किंगमेकर ठरतील, असे विधान नवाब मलिक यांनी केले. या विधानाबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. या राज्यामध्ये २६ तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेले आपण पाहाल. कोण काय बोलताय कोणाचे काय दावे आहेत हे आता कशाकरिता? आधी जिंकून या, अजित पवार यांच्यासह आधी सर्व जिंकून या. बारामतीची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी खुद्द शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील अन्य सदस्यही युगेंद्र पवार यांच्या बाजूने असल्याचे म्हटले जात आहे.