सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:45 PM2024-11-07T12:45:57+5:302024-11-07T12:46:36+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर कधी हे सदा खोत कोण आहेत? राज्यात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तुमचं योगदान काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्ती केली आहे. संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा निषेध नोंदवताना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र नाकारत आहे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. संतांचे राज्य आहे. म्हणून आम्हाला या राज्याची सत्ता बदलायची आहे.
आपल्या राज्याला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक अशा सर्व महान राजकारणाची परंपरा आहे. त्या तुळशीच्या वृंदावनात ही भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर कधी हे सदा खोत कोण आहेत? राज्यात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तुमचं योगदान काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, कोणाच्या व्यंगाकडे बघून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.