"रश्मी शुक्लांची बदली करुन सरकारच्या थोबाडीत दिली"; शरद पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:39 PM2024-11-04T14:39:30+5:302024-11-04T14:39:49+5:30

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar reaction after the transfer of Director General of Police Rashmi Shukla | "रश्मी शुक्लांची बदली करुन सरकारच्या थोबाडीत दिली"; शरद पवारांची प्रतिक्रिया

"रश्मी शुक्लांची बदली करुन सरकारच्या थोबाडीत दिली"; शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar on IPS Rashmi Shukla : विधानसभा निवडणुकीला १५ दिवस उरलेले असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फसणाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या आदेशानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात येत होता. त्यानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेसने तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या फायद्यासाठी राज्य सरकराने रश्मी शुक्ला यांना आणलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला. आता शरद पवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे.

"निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. माझ्या मते राज्य सरकारला थोबाडीत देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचा कार्यकाळ संशयित आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणे अनेकजण बोलतात. सत्तेचा गैरवापर त्यांच्या संबधित आहे. अशा व्यक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्यकाळात ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला," असं शरद  पवार म्हणाले.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्यावर याआधी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. संजय राऊत, नाना पटोले व इतर विरोधी नेत्यांचे अजूनही फोन टॅपिंग केले जात असल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आले होते. नाना पटोले यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar reaction after the transfer of Director General of Police Rashmi Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.