Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसचा गेम झाला. सगळ्यात जास्त आमदार असूनही त्यांना केवळ ८५ जागा मिळाल्या. दोन मांजरांच्या भांडणात बोका लोण्याचा गोळा मटकावतो. हा बोका कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. लोकांच्या मनामधला मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांच्या मध्ये उतरावे लागते. लोकांशी फेस टू फेस बोलावे लागते. फेसबुक लाईव्ह करुन कोणी मुख्यमंत्री होत नाही. एक दिवस जनताच तुमच्या तोंडाला फेस आणेल, या शब्दांत शिवसेना शिंदे गटातील महिला नेत्याने ठाकरे गटावर टीका केली.
विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मनसेकडून संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरळी मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे जनतेतून निवडणूक लढवणार आहेत की, प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार
लोकसभा निवडणुकीत आव्हान देणारे उंदरासारखे वरळीच्या बिळात जाऊन लपले. लोकसभेत फेक नरेटिव्हच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांची मते मिळवली. मात्र ठाकरे गटाने पहिल्या यादीत किती अल्पसंख्यांकांना उमेदवारी दिली, ते पाहावे. निवडणुकीत वापरा आणि फेकून द्या, असे ठाकरे गटाचे धोरण आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला ठाकरे गटाने नाशिकमधून उमेदवारी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरणार आहेत. मात्र ठाकरे गटात आदित्य ठाकरेंनी पहिला अर्ज भरला. स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे जनतेतून निवडणूक लढवणार आहेत की, प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार, असा खोचक सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.
दरम्यान, वरळीला विकासापासून वंचित ठेवलेल्या आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु आहे. ठाकरे गटाने १४६ जागांसाठी भाजपाबरोबर युती तोडली आणि आता त्यांना ८५ जागा मिळत आहेत. १९९५ मध्ये शिवसेनेला १६९ जागा, १९९९ मध्ये १६१ जागा, २००४ मध्ये १६३ जागा, २००९ मध्ये १६० जागा आणि २०१४ युती तोडल्याने शिवसेना २८६ जागांवर निवडणूक लढली होती. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. आता केवळ ८५ जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीने ठाकरे गटाला खरी जागा दाखवली, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.