Sada Sarvankar ( Marathi News ) :माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. कारण या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवार देण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत. सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेत अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपसह स्वपक्षातील नेत्यांकडूनही दबाव येत आहे. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आज सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचे व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत आले असून समाधान यांनी थेट वडिलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेळ सांगून टाकली आहे.
"आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सर्वांनी शाखा क्रमांक १९४ सामना प्रेस प्रभादेवी इथं उपस्थित राहावं," असं आवाहन समाधान सरवणकर यांनी केलं आहे. समाधान सरवणकर यांच्याकडून वडील सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची घोषणा करण्यात आल्याने आता माहीममध्ये तिरंगी लढत अटळ असल्याचं दिसत आहे.
मतदारसंघात कशी आहे राजकीय स्थिती?
लोकसभेत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने राहुल शेवाळे यांना माहीम विधानसभेतून १३,९९० मतांचे मताधिक्य मिळाले होते. माहीम परिसरात उद्धवसेनेचे अनिल देसाई यांना लीड होता. शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, अमित ठाकरे मैदानात उतरल्याने मनसेसाठी ती प्रतिष्ठेची झाली आहे. सरवणकर आणि ठाकरे दादरमधील, तर सावंत हे प्रभादेवीमधील रहिवासी आहेत. गेल्यावेळी काँग्रेस उमेदवाराला १५,२३५ मते होती. त्यामुळे काँग्रेसच्या आघाडीचा उद्धवसेनेला फायदा होईल. येथे सव्वालाख मराठी तर अल्पसंख्याकांची ३८ हजार मते आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीयांची प्रत्येकी २० हजार मते आहेत.
२०१९ विधानसभा निवडणूक (मते)
सदा सरवणकर (शिंदेसेना) ६१,३३७संदीप देशपांडे (मनसे) ४२,६९०प्रवीण नाईक (काँग्रेस) १५,२४६
२०२४ लोकसभा (माहीम - मते)
राहुल शेवाळे (शिंदेसेना) ६९,४८८अनिल देसाई (उद्धवसेना) ५५,४९८
माहीम भागातील मते निर्णायक ठरणार
माहीम विधानसभेत दादर, प्रभादेवी आणि माहीम या भागांचा समावेश आहे. माहीम भागात अल्पसंख्याक समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांना येथे चांगले मतदान झाले होते. त्यातून त्यांची पिछाडी काही प्रमाणात भरून निघाली होती.