अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:08 AM2024-11-15T11:08:48+5:302024-11-15T11:11:36+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले जात आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group mahayuti candidate sada sarvankar meet pm modi at shivaji park rally | अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...

अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मनसे पूर्ण ताकदीने निवडणुका लढत आहे. राज ठाकरे राज्यभरात दौरे करून प्रचारसभा घेत आहेत. परंतु, सर्वाधिक लक्ष माहीम मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. या मतदारसंघात भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला तरी दुसरीकडे सदा सरवणकर यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. 

माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत मैदानात आहेत. यातच महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्यामुळे मनसेचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. यातच शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत सदा सरवणकर यांचीही उपस्थिती होती. एकीकडे भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना प्रोत्साहन मिळत आहे.

सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. मुंबईच्या महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. माहीम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर मंचावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या या सर्व उमेदवारांची भेट घेत होते. सदा सरवणकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. नरेंद्र मोदी समोर येताच सदा सरवणकर यांनी आधी हस्तांदोलन करत वाकून नमस्कार केला. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. अगदी शेवटच्या घटकेला सदा सरवणकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज ठाकरे यांनी भेट नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यात हस्तक्षेप करत सदा सरवणकर यांना माघार घेण्याबाबत सल्ला दिला होता. परंतु, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाराजीनाट्य, मानापमान आणि अनेक घडामोडी घडत राहिल्या. शेवटी सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिली. या मतदारसंघातील तीनही उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत असून, कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group mahayuti candidate sada sarvankar meet pm modi at shivaji park rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.