ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 05:29 PM2024-11-09T17:29:28+5:302024-11-09T17:30:59+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अनेक वर्षांपासून मुंबईत प्रलंबित असलेल्या इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी मोर्चे का काढले नाहीत, असा सवाल करत राहुल शेवाळे यांनी यादीच वाचून दाखवली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group rahul shewale slams thackeray group and maha vikas aghadi over dharavi redevelopment | ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक वर्षांपासून धारावी पुनर्विकासाला होत असलेल्या विरोधामागे कष्टकरी कामगारांचा द्वेष हे मूळ कारण असल्याचा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपनेते, माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल शेवाळे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून मुंबईत प्रलंबित असलेल्या इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोर्चे का काढले नाहीत? असा सवाल समस्त राहुल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

विविध समाजाच्या लोकांवर अप्रत्यक्षरित्या अन्याय केला 

सत्तेत आलो तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी उद्धवजी ठाकरे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे म्हणाले की, वास्तविक धारावी विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. माझे बालपण धारावीत व्यतीत झाल्याने धारावीचा सुपुत्र म्हणून मला आणि इथल्या हजारो स्थानिकांना अनेक प्रश्न पडले आहेत. धारावीत मोठ्या संख्येने दलित, वाल्मिकी, कुंचीकोरवे, नाडार आणि अशा अनेक समाजांचे वास्तव्य आहे. उबाठा गट आणि महाविकास आघाडी कडून सातत्याने धारावी पुनर्विकासाला होणाऱ्या विरोधातून त्यांची दलित विरोधी प्रवृत्ती प्रकर्षाने जाणवते. धारावी पुनर्विकासाला विरोध करून या विविध समाजाच्या लोकांवर अप्रत्यक्षरित्या गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय केला जात आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली.

धारावीकरांना अद्ययावत आरोग्यसुविधा मिळू नयेत, अशी उबाठाची इच्छा आहे का?

मुंबईतील म्हाडा, एसआरए आणि अन्य रखडलेल्या प्रकल्पांची माहिती देतानाच राहुल शेवाळे यांनी अनेक आरोप केले. शेवाळे म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची सुरुवात करून काही काळासाठी दादरच्या ज्या खांडके बिल्डिंग मध्ये वास्तव्य केले, त्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी उबाठाने कोणताही मोर्चा कधीच नेला नाही. शिवसेना भवनाच्या मागे असलेल्या भिडे बिल्डिंगच्या पुनर्विकासाचे अनेकांचे स्वप्न आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही, ही लज्जास्पद बाब आहे. दादर मधील आर के बिल्डिंग,गोरेगाव मधील पत्रा चाळ, घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगर,वडाळा येथील अनेक जुन्या इमारती, मुंबईतील गावठाण - कोळीवाडे, मुंबईतील निर्वासितांच्या वसाहती या सगळ्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी केवळ आणि केवळ धारावीकरांबाबत खोटी सहानुभूती दाखवत त्यांच्याच पुनर्विकासात खोडा घालते आहे, यामागे नेमकी काय दडले आहे? हा प्रश्न सामान्य धारावीकरांना पडला आहे. दलित आणि कष्टकऱ्यांच्या धारावीतील सर्व समाजाने वर्षानुवर्ष प्रतिकूल परिस्थितीतच आयुष्य जगावे, त्यांना मूलभूत सुविधा मिळू नये, धारावीकरांना अद्ययावत आरोग्यसुविधा मिळू नयेत, अशी उबाठाची इच्छा आहे का? असा सवाल शेवाळे यांनी केला.

रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास रोखण्यामागे असलेला विकासक नेमका कोणाचा मित्र आहे?

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास रोखण्यामागे असलेला विकासक नेमका कोणाचा मित्र आहे?  त्या मित्रासह अनेक प्रकल्प रखडवणाऱ्या मुंबईतल्या इतर विकासकांना पाठीशी घालण्यासाठीच उबाठा कडून वारंवार केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आरोप करून खोडा घालण्याचे काम सुरू आहे का? असे प्रश्न धारावीकरांना पडले आहेत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. तसेच  धारावीमुळे मुंबई बकाल होईल, या उबाठा च्या वक्तव्याचा निषेध करतो. यातून मुंबईच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या धारावीतील कष्टकरी आणि कामगार बांधवांच्या विषयी असलेली असूया दिसून येते. कोरोना काळात ज्या धारावीकरांनी मुंबईकरांना जीवदान दिले, त्यांचा अपमान करणाऱ्या या वक्तव्याला धारावीकर मतदानातून लवकरच उत्तर देतील, असेही राहुल शेवाळे म्हणालेत.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group rahul shewale slams thackeray group and maha vikas aghadi over dharavi redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.