माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 12:24 PM2024-11-03T12:24:00+5:302024-11-03T12:25:31+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, एका मोठ्या अटीवर उमेदवारी मागे घेण्याबाबत संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. यातच महाराष्ट्रातील दोन ते तीन लढतींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. यापैकी एक म्हणजे माहीम मतदारसंघ. या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर अद्यापही माघार न घेण्यावर ठाम आहेत. परंतु, उमेदवारी मागे घेण्याचे काही संकेत देताना सदा सरवणकर यांनी महत्त्वाची एक अट मनसेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून महेश सांवत रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत भाष्य केले. त्यानंतर सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका होऊनही सदा सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीत. याबाबत ते राज ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.
राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे
मी महायुतीचा उमेदवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनीही मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. मी उमेदवारी अर्ज भरला असून प्रचारालाही सुरुवात केली आहे. मला माझ्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास आहे. मी त्यांच्यासाठी गेली १५ वर्षे केलेल्या कामाची पावती मला नक्की मिळेल. माझे मतदार माझ्यावर खूप प्रेम करतात, ते मला नक्कीच जिंकवतील. महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे आणि त्यासाठीच मी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. मी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही मला शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत,
सदा सरवणकर यांनी ठेवली मोठी अट, उमेदवारी मागे घेण्याचे दिले संकेत
एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. आधी मनसेने आपले उमेदवार मागे घ्यावेत, मग माझ्याकडून तशी अपेक्षा करावी, असे सांगून सदा सरवणकर यांनी अट ठेवत उमेदवारी मागे घेण्याचे संकेत दिले आहेत, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. डोअर टू डोअर ते प्रचार करत आहेत. यातच मीडियाशी बोलताना सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत सूचक विधान केल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत सदा सरवणकर काय भूमिका घेतात, सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यास अमित ठाकरे यांच्यासाठी विजयाचा राजमार्ग खुला होणार का की माहीम मतदारसंघात आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.