"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:40 PM2024-10-23T17:40:00+5:302024-10-23T17:43:02+5:30

ठाकरे गटाने माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देण्याचे निश्चित केल्याने त्यांच्यावर टीका केली जातेय.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shivsena kiran pawaskar criticize uddhav thackery over amit thackeray in mahim assembly constituency | "उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन

"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन

Mahim Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनने ४५ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचेही नाव आहे. माहीम दादर विधानसभा मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत. तर ठाकरे गटानेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देण्याचे निश्चित केलं आहे. अमित ठाकरेंविरोधात उमेदावर देणार असल्यामुळे ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंना मनसेने उमेदवार म्हणून उभं केलं आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंविरोधात शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात उमेदावर उभा न करता अप्रत्यक्षपणे मदत केली होती. या निवडणुकीत अमित ठाकरेंच्या बाबतीत याची परतफेड केली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता ठाकरे गटाकडून महेश सावंत हे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यावरुन किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही, असं किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.

"राज ठाकरेंनी आपले विषय मांडताना सडेतोडपणे मांडले आहेत. राजकारणाचा, पैशाचा, खुर्चीचा विचार न करता ते बोलले आहेत. आज राज ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे चिरंजीव माहीम विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांनी नातं जपलं आहे. नात्याबरोबर पहिल्यांदा माझा पुतण्या लढत असेल तर उमेदवार देऊ नये ही एक भावना त्यांनी पाळली. मात्र त्यांचे चिरंजीव निवडणुकीसाठी उभे राहिले म्हणून त्याची परतफेड करण्याचे साधे सौजन्य पण उद्धव ठाकरेंमध्ये राहू नये हे लाजीरवाणे आहे," अशी टीका किरण पावसकर यांनी केली आहे.

 "नातं जपतील असं आम्हाला वाटलं होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून नातं जपलं नाही, मराठी माणसाला जपलं नाही, भावाला बाळासाहेबांच्या विचारांना जपलं नाही. कशाचीही काही फिकीर न करता फक्त खुर्ची. मला मुख्यमंत्री करा मी घरात बसेन आणि माझा मुलगा मंत्री कसा होईल आणि बाकी सगळे तेल लावत गेले हा एकच प्रकार चाललेला आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे अशी परतफेड केली आहे राज ठाकरेंची. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसं कधीही हे विसरणार नाही," असेही किरण पावसकर म्हणाले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shivsena kiran pawaskar criticize uddhav thackery over amit thackeray in mahim assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.