दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:55 AM2024-11-13T04:55:53+5:302024-11-13T04:56:13+5:30
‘सक्षम ॲप’वर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर येण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी निवडणूक प्रशासन विशेष खबरदारी घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मतदारांसाठी व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकती ‘व्हीलचेअर’ची आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील अशा मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचता यावे यासाठी ‘सक्षम ॲप’वर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहनव्यवस्था
- मुंबई शहरातील कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, वरळी, शिवडी, वडाळा, माहीम, धारावी, सायन कोळीवाडा या दहा मतदारसंघांत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांसाठी वाहतूक सुविधा असेल.
- दृष्टिहीन मतदारांना ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात येतील. ब्रेल मतपत्रिका आणि ब्रेल लिपीतील मतदार स्लिपही वितरित करण्यात आल्या आहेत.
- शहर जिल्ह्यासाठी दिव्यांग समन्वयक म्हणून दिलीप यादव यांची नियुक्ती केली आहे. मदतीसाठी ९५९४१४४९९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.