Join us

“पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 4:29 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:  महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:  महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 

नरेंद्र मोदी जोपर्यंत येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही. हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यंत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारला दीड वर्षात शेतकऱ्यांची आठवण आली नाही पण आता त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली असून कर्जमाफी करण्याच्या वल्गना करु लागले आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी दिसले नाहीत आता त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांना यांची आठवण झाली आहे. आता भाजपा युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडी