Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्याकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. मधुरिमा यांच्या माघारीवरून खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील वादही चव्हाट्यावर आला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
मीडियाशी बोलताना कोल्हापूर उत्तरमध्ये घडलेल्या प्रकारावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो होतो. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे. २०१९ साली अपघाताने आम्ही हरलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सांगितले होते की, पोटनिवडणुकीत आम्ही आपल्याला पाठिंबा देतो. पण, नंतर ही जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे. आता त्या जागेत गोंधळ निर्माण झाला आहे. पण ती जागा सहा ते सात वेळा शिवसेनेने जिंकली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे आम्ही काहीही करणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
उमेदवारी मागे घेताना नाट्यमय घडामोडी घडल्या
राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न सुरू होते. मात्र, लाटकर 'नॉटरिचेबल' झाले. त्यातच लाटकर माघार घेणार नसतील तर आम्हीच माघार घेऊ, अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली. दुपारी २ वाजून ५० मिनिटांनंतर अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. लाटकर काही आलेच नाहीत, मात्र मधुरिमाराजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. पाठोपाठ शाहू छत्रपती आले. गाडीतून उतरताच 'हीच का तुमची लोकशाही. काय झाले लाटकर यांच्या माघारीचे', अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांना त्यांनी सुनावले.
दरम्यान, राजेश लाटकर एक चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना आम्ही विनंती केली होती, तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मधुरिमाराजेंना नाईलाजाने माघार घ्यावी लागली, असे खा. शाहू छत्रपती यांनी सांगितले. तर, 'दम नव्हता, तर निवडणुकीला उभे राहायचे नव्हते ना मग, मी पण माझी ताकद दाखविली असती, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या माणिक मंडलिक यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला.