Join us

नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 5:37 PM

४ तारखेपर्यंत मलिक यांच्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत अजित पवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : भाजपच्या तीव्र विरोधानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या या निर्णयावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी मात्र नवाब मलिक यांची पाठराखण करत त्यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी ४ तारखेपर्यंत मलिक यांच्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत अजित पवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे.

"विधानसभा उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. ४ तारखेला ३ वाजेपर्यंत आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर तुम्हाला कसलेही प्रश्न उपस्थित राहणार नाहीत," असं अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार हे नवाब मलिक यांना अर्ज मागे घ्यायला लावणार की या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार माघार घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, "नवाब मलिक यांच्याबाबत आमची भूमिका अशी आहे की, त्यांच्यावर फक्त आरोप झाले आहेत, ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. आमच्या मते त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायव्यवस्था न्याय देईल, तेव्हा वस्तुस्थिती आपल्याला कळेल," अशा शब्दांत अजित पवारांनी मलिक यांची पाठराखण केली आहे.

नाराजी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अजित पवारांच्या भूमिकेबाबत भाजपने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत आम्ही अतिशय स्पष्टपणे आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितली होती. नवाब मलिकांना तुमची अधिकृत उमेदवारी देऊ नका, महायुतीत हे चांगल्या प्रकारे घेतलं जाणार नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांनी मलिक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आम्ही मलिक यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार उभा केला आहे. आम्ही शिवसेनेचं काम करू, भाजप कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचं काम करणार नाही," अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

"मी महायुतीचा उमेदवार नाही"

"मी महायुतीचा उमेदवार आहे, असं तर तुम्ही बोलू शकत नाही. कारण शिवसेनेचा उमेदवार तिथे आहे. भाजपचे कार्यकर्ते माझं काम करणार नाही, असं उघडपणे भाजपचे नेते सांगत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. माझ्यासोबत महायुतीचे दुसरे उमेदवार उभे आहेत," असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४नवाब मलिकमानखुर्द शिवाजी नगरअजित पवारदेवेंद्र फडणवीसमुंबई विधानसभा निवडणूकमहायुती