लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी उद्धवसेना आणि मनसे यांनी केलेले अर्ज आणि स्मरणपत्रे मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाने नगरविकास खात्याकडे पाठवले असून त्यावर अंतिम निर्णय नगरविकास खातेच घेणार आहे. शिवाजी पार्कवर १० नोव्हेंबरला शिंदेसेनेची सभा होणार होती. १२ नोव्हेंबरला भाजपचीही सभा झाली नाही. १४ नोव्हेंबरला अजित पवार गटाला मैदानात सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे याच दिवशी महायुतीची एकत्रित सभा होण्याची शक्यता आहे.
सभा आणि विविध कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क ४५ दिवस आरक्षित असते. हा कोटा संपला असून फक्त १७ नोव्हेंबर हा दिवस शिल्लक आहे परंतु शिंदेसेनेची आणि भाजप यांच्या सभा न झाल्याने आणखी दोन दिवस अतिरिक्त मिळू शकतात. त्यामुळे एकूण तीन दिवस मैदान उपलब्ध होऊ शकते. ही बाब ध्यानात घेता मनसे आणि उद्धवसेनेला मैदान मिळण्याची आशा आहे.
वाद टाळण्यासाठी तोडगा निघेल?मनसे आणि उद्धवसेनेला मैदान न मिळाल्यास पक्षपातीपणाचा आरोप होऊ शकतो. ऐनवेळी हे दोन्ही पक्ष प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे वाद टाळण्यासाठी मैदानाचे वाटप होईल, अशी शक्यता आहे.
- महायुतीतील तिन्ही पक्षांना शिवाजी पार्क मिळाले आहे. मात्र, मनसे आणि उद्धवसेनेचा अर्ज अजूनही विचारात घेतलेला नाही. - मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी सोमवारी पुन्हा एकदा पालिका विभाग अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन आणि कागदपत्रे जमा केली.