लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : १९९९ ते २०१९ दरम्यान काँग्रेस आणि भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी विरुद्ध दिशेने गेल्याचे दिसून येते. १९९९ मध्ये सर्वाधिक २७.२ टक्के मते असलेल्या काँग्रेसचा मतटक्का सातत्याने कमी होत २०१९ मध्ये १६.१ टक्क्यांवर घसरला, तर त्याचवेळी भाजपचा १४.५ टक्के असलेला मतटक्का वाढत २६.१ टक्क्यांपर्यंत वाढत गेला असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर येते.
२००४ मध्ये काय झाले? प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने ओबीसी आणि मागासवर्गीय मतदारांना चुचकारल्याने काँग्रेसचा असलेला मूळ मतदार या पक्षांकडे जाण्यास सुरुवात झाली. त्याचा फटका काँग्रेसला बसला.
२००९ मध्ये काय झाले? भ्रष्टाचाराची प्रकरणे, वाद, काँग्रेसविरोधात झालेले वातावरण यासह मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने छोट्या पक्षांकडे मतदार मोठ्या प्रमाणात वळले गेले.
२०१४ मध्ये काय झाले? पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ झाली.त्यामुळे भाजपचा २००९ मध्ये १४ टक्के असलेला मतटक्का थेट तब्बल २८.१ टक्क्यांवर पोहोचला. शिवसेनेची मतेही १६.१ टक्क्यांवरून १९.५ टक्क्यांवर पोहोचली.
२०१९ मध्ये काय झाले? - नोटाबंदी आणि जीएसटी विधेयक आणूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम राहिली.- यावेळी भाजपच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यांनी कमी झाली, तरीही भाजप हा राज्यात सर्वाधिक मते घेणारा पक्ष ठरला. यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली.