मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 07:10 AM2024-11-13T07:10:05+5:302024-11-13T07:10:21+5:30
सर्वाधिक जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी या केंद्रांची संकल्पना राबविली जात आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असेल. सर्वाधिक जळगावमध्ये ३३, गोंदिया
३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्व महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांचा अधिक सहभाग यासाठी हा उपक्रम आहे. या केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
कोणत्या मतदान केंद्रांची निवड?
‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. अशी केंद्रे निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे.
संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यानजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवरअधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.