मुंबई – राज्यात वाढणाऱ्या ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारच्या टास्क फोर्सची गुरुवारी बैठक झाली. यात आजपासून राज्यात नवीन नियमावली जाहीर करण्याचं निश्चित झालं. मात्र त्यामुळे राज्याचं सुरु असलेले हिवाळी अधिवेशन वेळेआधीच गुंडाळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. २८ डिसेंबर रोजी अधिवेशनाची सांगता होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हे अधिवेशन संपणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. साधारणतः हे लोकशाहीच मंदिर आहे. लोकशाहीचा अनादर दाखवण्याचा काम कोणीही दाखवू नये. आज पाहिले तर महाराष्ट्राचे २०० प्रश्न समोर आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. कामगार, शेतकरी कामगार अनेक प्रश्न आहेत यावर चर्चा करण्याच एक जागा आहे ती म्हणजे विधानभवन. त्यामुळे चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी आमची आग्रही मागणी राहील असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा वाढवावा, जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा. ज्या कोरोनाचं कारण दिलं जातय त्या कोरोनावर देखील चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने अधिवेशन गुंडाळणे योग्य राहणार नाही. लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील अधिवेशन संपवतील असा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला दिला आहे.
राज्यात आजपासून नियमावली जाहीर होणार
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आजपासून २४ डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. देशात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पाऊलं उचलणार आहे. राज्यात पुन्हा रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ३१ डिसेंबरला रात्री केले जाणारे नववर्षाचे सेलिब्रेशन यावर निर्बंध आणण्यासंदर्भातही या बैठकीत विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.