हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे; ७ डिसेंबरपासून सुरुवात, पुरवणी मागण्या मांडण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 06:21 AM2023-10-22T06:21:37+5:302023-10-22T06:22:09+5:30
शेतकरी, मजूर, बेरोजगार अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी किमान तीन आठवडे अधिवेशन घ्या, अशी मागणी होत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाचे १४ दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, चार दिवस सुट्टी आणि दहा दिवसांचे कामकाज असे दोन आठवड्यांत अधिवेशन पार पडेल.
या पार्श्वभूमीवर शेतकरी, मजूर, बेरोजगार अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी किमान तीन आठवडे अधिवेशन घ्या, अशी मागणी होत होती. अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालेल. सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनापूर्वी बैठक होईल. यात कालावधी व रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. या अधिवेशनातही पुरवणी मागण्या मांडण्यात येणार असून, त्या मंजुरीसाठी विनियोजन विधेयक सादर केले जाईल. मागील अधिवेशनातील रेकॉर्डब्रेक पुरवणी मागण्यानंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी किती हजार कोटींच्या पुरवणी मागण्या असतील, याबाबत उत्सुकता आहे.
शेतकरी, मजूर, बेरोजगारी, युवक, प्रत्येक घटकांतील सर्वांना न्याय देण्यासाठी किमान तीन आठवडे अधिवेशन घ्यायला हवे. सल्लागार समितीत त्यावर अंतिम निर्णय होईल, परंतु राज्य सरकारने दहा दिवसांत अधिवेशन गुंडाळू नये. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.