महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 12:01 PM2018-01-03T12:01:04+5:302018-01-03T17:56:45+5:30
मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे.
मुंबई- महाराष्ट्र बंदचे पडसाद राज्यभर उमटायला लागले. मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक आंदोलकांमुळे विस्कळीत झाली होती. पण काही वेळापूर्वी महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. ठाणे, कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, दादर स्थानकांमध्ये आंदोलन झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोवंडी आणि जुईनगर इथे रेलरोको केल्याने हार्बर रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. पण आता हार्बर मार्ग पूर्वपदावर येतो आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेलरोको करण्यात आला होता त्यामुळे उल्हासनगरच्या दिशेने जाणारी लोकल काही मिनिटं अडवण्यात आली होती. नालासोपारा स्टेशनवर आंदोलकांनी ट्रॅकवर उतरुन आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाकडून आंदोलकांना हटवून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र बंदचा परिणाम मेट्रो वाहतुकीवरही झाला घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. आंदोलकांनी बंद पाडलेली मेट्रो रेल्वे सेवा सुमारे घाटकोपर ते एअरपोर्ट रोड पर्यंत बंद होती आणि पुढे एअरपोर्ट रोड ते वर्सोवा पर्यंतच सुरू होती.आता अंधेरी ते घाटकोपर मेट्रो सेवा सायंकाळी 5 वाजता सुरळीत सुरू झाल्याची माहिती मेट्रोच्या प्रवक्त्याने दिली आहे.