महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 02:52 PM2018-01-03T14:52:16+5:302018-01-03T15:57:40+5:30
भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत आहेत. मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.
मुंबई - भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत आहेत. मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजेपर्यंत बेस्टच्या 48 बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेत काचा लागून 4 बसचालक जखमी झाले आहेत.
- गोवंडी येथे 19 क्रमांकाची बस फोडली
- मंत्रालय ते शिवाजीनगरपर्यंत जाणारी बस फोडली
गोवंडी येथे ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे आंदोलकांनी अडवला, महिला आंदोलकांचा मोठा सहभाग
#Maharashtra: Two Thane Municipal Transport buses and an auto-rickshaw vandalized in Chendani Koliwada area, four passengers injured #BhimaKoregaonViolencepic.twitter.com/dma7yAejdU
— ANI (@ANI) January 3, 2018
मुंबईतील मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीनमधील 'शो' रद्द
मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले आहे. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरु आहेत. येथील फिल्मसिटीत रस्ते आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने हिंदी मालिकांचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. तर, शहरातील अनेक चित्रपटगृहातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. याचबरोबर, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणारा ढाई अक्षर प्रेम के या नाटकाचा शो सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आज दुपारी आंदोलकांनी मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. सध्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट असून, रेल्वेचे कर्मचारी रुळावर फेकण्यात आलेल्या स्टीलच्या खुर्च्या आणि अन्य साहित्य ट्रॅकवरुन हटवत आहेत.
घाटकोपरच्या आरसिटी मॉलजवळ तणाव
घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे. काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत. आरसिटी मॉलच्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळण
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीच्या काचा फोडल्या. कल्याणच्या पत्री पुलावर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा तोडल्याचे वृत्त आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे.
दादरमधील आंदोलन समाप्त
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेल रोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाडयात ही रॅली आल्यानंतर मोठया संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामात परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी काहीवेळासाठ रास्ता रोको आंदोलन केले.