मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून त्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही बैठक बोलावली असून यासाठी विधानभवनाच्या दोन्ही सभागृहातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीतील मॅरेथॉन चर्चेनंतर ही माहिती दिली.
मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मॅरेथॉन चर्चा झाली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व घडामोडींची माहिती दिली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही; पण हे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार काय काय प्रयत्न करीत आहे हे जनतेसमोर प्रकर्षाने मांडण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी वर्षे सत्ता असतना मराठा समाजाला काहीही मिळाले नाही. आपल्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतानाच मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ते प्रभावीपणे जनतेत जाऊन मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
भाजपा श्रेष्ठींचे आदेश
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात येणार असल्याची हूल शिवसेनेने उठवून दिल्यानंतर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.