मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले तर अपक्ष आमदार सरकारसोबत राहणार नाही, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठाच आधार मिळाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयाला काल फोडणी दिली होती. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु, रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदार आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिलेत.
रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना राज्य कसे चालवावे हे चांगले माहीत आहे. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला चांगला अनुभव आला आहे. यापुढेही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. जर मुख्यमंत्री बददले तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढू.
महाराष्ट्रात एकूण सात अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा दिलाय. त्यात, रवी राणा, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील, मोहन फड आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व रवी राणा करत आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती केली. यावेळी मराठा आरक्षणावरही ते सकारात्मक बोलले. मराठा आरक्षण देण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत, असं त्यांनी नमूद केलं. जनतेची कामं कशी करायची हे त्यांना माहीत आहे आणि शिवसेनाही त्यांच्याचमुळे सत्तेत आहे, असंही ते म्हणाले.