Maharashtra Bandh मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राणे मुख्यमंत्र्यांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 06:43 PM2018-07-25T18:43:23+5:302018-07-25T18:45:11+5:30
Maharashtra Bandh एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत आज मराठा समाजानं मुंबई बंदच आवाहन केलं होतं. त्याला मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादानं तो यशस्वीही झाला.
मुंबई- एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत आज मराठा समाजानं मुंबई बंदच आवाहन केलं होतं. त्याला मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादानं तो यशस्वीही झाला. परंतु आंदोलन मागे घेतलं असलं तरी अद्यापही मराठ्यांच्या आरक्षणाबाबत सरकारमध्ये सुंदोपसुंदी आहे. सकल मराठा समाजासोबत आपण चर्चेस तयार असून, आंदोलकांनी हिंसाचार करण्यापेक्षा चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खदायी आहेत.
राज्य सरकारचे असे स्पष्ट मत आहे की, या योजनांसंदर्भात किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.