मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून एसटी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, नागपूर, पनवेल, अलिबाग येथील एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबईमध्ये ही अशीच परिस्थिती आहे. गुरुवारी (9ऑगस्ट)सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विभागातील कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल येथून एक ही एसटी रवाना झालेली नाही. मुंबईत बंदला हिंसक वळण लागले नसले तरी अन्य शहर वगळता अन्य भागातील परिस्थिती पाहता एसटी सुरक्षितता लक्षात घेता एसटी मार्गस्थ न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यभरात देखील 250 आगारातील 550 हून जास्त एसटी स्थानकावर हीच स्थिती आहे. एसटी च्या 18 हजार फेऱ्यांमधून सुमारे 70 लाख प्रवाशांची वाहतूक होते. मात्र बंदमुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे.