Join us

Maharashtra Bandh: व्यापारी दुपारी चारपर्यंत Mumbaiतील दुकाने बंद ठेवणार, शिवसेनेशी चर्चेनंतर संघटनांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 7:52 AM

Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violence: महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी संघटनेने रात्री उशिरा पाठिंबा दिला आहे. Shiv Sena नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शाह यांनी दिली.

मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी संघटनेने रात्री उशिरा पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शाह यांनी दिली.  कोरोना काळात ठप्प असलेला व्यापार आता सावरत आहे. त्यातच सणासुदीत बंद पुकारणे बरोबर नाही. कामगारांचे पगार, विविध कर भरायचे असतात. त्यामुळे या बंदमध्ये दुकानदार सहभागी होणार नाहीत. आघाडी सरकारने दुकानदारांची अडचण समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यापूर्वी केले होते.लखीमपूर येथील हिंसेचा निषेधच आहे. यातील दोषींवर कारवाई व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, अशी भूमिका घेत शाह यांनी रात्री उशीरा बंदला पाठिंबा दिला. 

निषेध करायचे तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा, बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामील न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालू ठेवावीत.- यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना 

दडपशाही सहन करणार नाही - भाजपपक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून कोणी मुंबईकरांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप प्राणपणाने त्याला विरोध करेल, असे मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर यांनी सांगितले. लखीमपूरमधील घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. सरकारी दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल, असे ते म्हणाले. 

बंदच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तमुंबई : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी  पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमतेची हानी व कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच सरकार प्रेरित बंद असला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबईसह सर्वत्र  पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हिंसक कारवाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

बंदमध्ये डबेवाल्यांचा सहभाग नाही- मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यात मुंबई डबेवाला संघटना सहभागी होणार नाहीत. आम्ही डबेवाले शेतकरी कुटुंबातील आहोत. -लखीमपूर घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. परंतु, आता कुठे आमचा व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याने इच्छा असतानाही बंद मध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र हातावर काळ्या फिती बांधून आम्ही या घटनेचा निषेध करणार आहोत, अशी माहिती डबेवाले संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Bandhमुंबई