Join us

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला फटका, ११ बसगाड्यांचे नुकसान; दोन कोटींचे उत्पन्नही बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:21 PM

बेस्ट उपक्रमाने नुकताच सादर केलेल्या सन २०२२- २३ च्या अर्थसंकल्पात दोन हजार २३६ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

मुंबई- आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मोठा फटका सोमवारी बसला. लखीमपूर खीरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुकारलेल्या बंदमुळे बेस्टच्या बसगाड्या बस आगारांबाहेर पडू शकल्या नाहीत. तर कर्मचाऱ्यांना आण्यासाठी बस आगाराबाहेर पडलेल्या बसगाड्यांनाच लक्ष्य करण्यात आले. यामुळे ११ बस गाड्यांचे नुकसान झाले असून दिवसभराचे उत्पन्नही बुडाले. संध्याकाळी पाचनंतर सुमारे एक हजार बसगाड्या रस्त्यांवर उतरविण्यात आल्या. 

बेस्ट उपक्रमाने नुकताच सादर केलेल्या सन २०२२- २३ च्या अर्थसंकल्पात दोन हजार २३६ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी बेस्ट बसगाडीवरच पहिला हल्ला होत असल्याचे दिसून आले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सावधिगिरी म्हणून बेस्ट उपक्रमाने काही बसगाड्यांना जाळ्या बसविल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांना बस आगारांमध्ये नेण्यासाठी बाहेर पडलेल्या बसगाड्यांवरच पहिला दगड भिरकावण्यात आला. यामध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खासगी कंपनीच्या बसगाडी समावेश होता.

बसगाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने अखेर दुपारनंतर बेस्ट उपक्रमाने पोलीस संरक्षण घेतले. त्यानंतर बसगाड्या बस आगारांतून बाहेर पडू लागल्या. दररोज सरासरी तीन हजार बसगाड्या बेस्टमार्फत चालविण्यात येतात. मात्र सोमवारी  संध्याकाळी ५.३० पर्यंत एक हजार आठ तर सात पर्यंत १८८६ बसगाड्या बाहेर पडल्या, असा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. मात्र मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली बेस्ट बस बंद असल्याने लाखो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. 

दोन कोटींचे उत्पन्न बुडाले-

बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज २७ लाख प्रवाशी प्रवास करीत असतात. यामुळे दररोज सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न बेस्टच्या तिजोरीत जमा होत असते. मात्र सोमवारी गर्दीच्या वेळीच बेस्ट बस सेवा बंद राहिल्याने सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले.

बसगाड्यांचे नुकसान-

धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल या ठिकाणी बस गाड्यांची तोडफोड झाली.

पगार कापणार-

या बंदमध्ये सहभागी होऊन कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Bandhबेस्टमहाराष्ट्र सरकार