Join us

युतीचा फॉर्म्युला बदलला; भाजपाच 'मोठा भाऊ' ठरला, पण 'छोटा भाऊ'ही खूश झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:22 AM

लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देआघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच  शिवसेना-भाजपा युती होण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई- लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच  शिवसेना-भाजपा युती होण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे.   लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना उद्धव ठाकरे यांनी ‘यापुढे भाजपाशी युती करणार नाही,’ अशी घोषणा केली होती. त्यानंतरही लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढावी, असा भाजपाचा आग्रह होता, तर लोकसभेचे जागावाटप जाहीर करतानाच विधानसभा निवडणुकीचेही जागावाटप जाहीर करण्याचा शिवसेनेचा आग्रह होता. तो भाजपाने मान्य केला असून, सध्याच्या चर्चेनुसार लोकसभेसाठी भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढवणार आहे.2014च्या निवडणुकीत भाजपाने 24, तर शिवसेनेने 20 जागा लढविल्या होत्या. चार जागांवर महायुतीतील घटक पक्ष लढले होते. भाजपाच्या ताब्यातील पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसनेला देण्यास तो पक्ष राजी झाल्याचे समजते. त्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ भाजपाला दिला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या समसमान 144 जागा दोन्ही पक्ष लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी युतीच्या चर्चेसाठी येण्याची शिवसेनेची मागणीही मान्य झाली असून, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली होती, तर युतीच्या घोषणेसाठी पक्षाध्यक्ष अमित शहा स्वत: येणार आहेत. याखेरीजही शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या मागण्या भाजपाने मान्य केल्याचे समजते.>मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई यशस्वीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आपला राज्यातील दौरा अर्धवट टाकून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. त्यातील तपशील लगेच जाहीर झाला नसला, तरी सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यात युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे आणि मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी झाल्याचे मानले जाते.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपा