Join us

संघाच्या निष्ठावंतांना डावलल्यामुळे महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया टीममध्ये उभी फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:18 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)चं पाठबळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकतर खालच्या पदावर आणले गेले आहे किंवा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे.

भाजपाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया युनिटमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडिया युनिटमध्ये 27 ऑगस्टला नवीन अधिका-यांच्या नेमणुकीला मंजुरी दिल्यानंतर हे चित्र समोर आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)चं पाठबळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकतर खालच्या पदावर आणले गेले आहे किंवा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. तर बाहेरील व्यक्तींना प्रमुख स्थान देण्यात आले आहे.  निष्ठावंतांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी शुक्रवारी निषेध म्हणून पायउतार होण्याचे सूतोवाच केले आहेत. शुक्रवारी इंडिया टुडेनं यासंदर्भात एक वृत्त प्रकाशित केलं होतं,  त्याच्या काही तासांनंतर भाजपामध्ये या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सोशल मीडिया युनिटमध्ये नवीन नेमणुका स्थगित केल्या गेल्या आहेत. "काही नावे कार्यकारी समितीमधून अनवधानाने वगळली गेली आहेत. काही बदल होईपर्यंत या नियुक्त्या थांबवल्या आहेत," असं भाजपाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाटील यांनी राज्य सोशल मीडिया संयोजक प्रवीण अलई यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अधिका-यांना मोठ्या बदलांसह मान्यता दिली. समीर गुरव यांच्यासह पाच सह संयोजकांपैकी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कायम ठेवले होते. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य पीयूष कश्यप यांनाही पदावरून दूर करण्यात आलं आहे. आरएसएसचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेले गुरव 2017 पासून महाराष्ट्र भाजपामध्ये सह-संयोजक आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किमान चार कार्यकर्ते, प्रतीक कर्पे (मुंबई), स्वानंद गांगल (ठाणे), दीपक जगताप (नाशिक) आणि अक्षय झवेरी (यवतमाळ) यांना राज्य कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. माध्यम चर्चेसाठी पॅनेलचा सदस्य बनवल्यामुळे गांगल यांना वगळण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले.कायदेशीर सह सल्लागार म्हणून भूषण तातिया यांची नियुक्ती केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर संतप्त पोस्ट टाकत आहेत. काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टी(आप)मध्ये सक्रिय असलेले तातिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करीत होते.गेल्या वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत तातिया यांनी शहा यांचे फोटो पोस्ट केल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी ट्विटरवर टाकले होते. भाजपाच्या एका सूत्राने सांगितले की, आजारपणामुळे काही दिवस  दूर राहिलेल्या संघटन सचिव विजय पुराणिक यांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया कार्यकारी समितीची स्थापना केली गेली आहे. प्रोटोकॉलनुसार नवीन नेमणुका करण्याबाबत त्यांचा सल्ला घेण्यात आला नाही, असे गजारिया यांनी सांगितले. परंतु त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला. महाराष्ट्र भाजपाची सोशल मीडिया टीम 2014पासून गोंधळात पडली आहे. 2014मध्ये श्वेता शालिनींनी भाजपात निष्ठावंतांना बाजूला सारलं जात असल्याचं सांगत वादाला तोंड फोडलं होतं. 2015मध्ये निष्ठावंतांनीही ट्विटरवर आपला राग व्यक्त केला होता, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांऐवजी पक्षात कमी योगदान देणा-यांना आमंत्रित केले गेले होते. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीस