Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोना रुग्णवाढ झपाट्यानं होत असल्यामुळं रहिवासी इमारत सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये एका दिवसात पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. मुंबईत आता एका रहिवासी इमारतीत एकूण संख्येचा २० टक्के रहिवासी किंवा १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे. याआधी इमारत किंवा विंगच्या एकूण क्षमतेच्या ४० टक्के रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्याचा नियम लागू करण्यात आला होता. मुंबईत सध्या एकूण ३८९ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत कोरोना रुग्णवाढीच्या आकडा १० हजारांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता ११० दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईत सध्या ४७,४७६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्के इतकं आहे. गेल्या २४ तासांत ६५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे.
मुंबईत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आरोग्य मंत्रालय आणि अधिकारी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक असून यात निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.