महाराष्ट्र बजेट 2019: 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 03:07 PM2019-06-18T15:07:31+5:302019-06-18T15:11:35+5:30
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून, फडणवीस सरकारनं अनेक क्षेत्रात भरीव तरतुदी केल्या आहेत.
मुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून, फडणवीस सरकारनं अनेक क्षेत्रात भरीव तरतुदी केल्या आहेत. 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तरुणांना सूक्ष्म, लघू उद्योग करण्यासाठी सरकार प्रोत्साहनही देणार आहे. राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तसेच सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता मिळाली आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ ६ हजार ४१० कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पात असून त्यानंतरही आवश्यकता भासल्यास सरकार अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच मागील साडेचार वर्षात ३ लक्ष ८७ हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि १ हजार ९०५ दक्षलक्ष घनमीटर (६७ टीएमसी) पाणीसाठा निर्माण करण्यात येणार आहे. मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. यात प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध्यम प्रकल्प व उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यातील २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात येणार असून, सदर प्रकल्पांची उर्वरित किंमत २२ हजार ३९८ कोटी आहे, त्यापैकी ३ हजार १३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्प प्राप्त होणार आहेत. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचंही मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.
साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. खुल्या कालव्यांऐवजी नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचे धोरण आहे, त्यामुळे भूसंपादनाच्या खर्चात बचत होणार आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागाकरिता रु. १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजार तरतूद केली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६ लक्ष २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण केली आहेत, त्या माध्यमातून २६.९० टीएमसी पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात येणार आहे, या योजनेवर रु. ८ हजार ९४६ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं आहे.