Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:27 AM2021-03-10T11:27:07+5:302021-03-10T11:37:09+5:30

Mansukh Hiren Death Case: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Maharashtra Budget 2021: Today is the last day of the convention and the BJP will take an aggressive stance in the Legislative Council | Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

googlenewsNext

मुंबई:  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Budget 2021) आज सांगता होणार आहे. १ ते १० मार्च अशा १० दिवसीय अधिवेशनात ८ दिवसांचे कामकाज होतं. त्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केल्याचा संशय मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांच्या पत्नीने एटीएसला दिलेल्या जबाबात व्यक्त केला असल्याचा आरोप करत वाझे यांना तत्काळ निलंबित व अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  मंगळवारी केली होती. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांसह सापडलेली  स्कॉर्पिओ गाडी ज्यांची होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीमध्ये ५ मार्च रोजी सापडला होता. हिरेनची पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबाची प्रतच देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात फडकवली. त्यामुळे सभागृह अवाक् झाले. 

वाझेंवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपा सदस्य आक्रमक झाले. वाझे पूर्वी कोणत्या पक्षात होते? हिरेन यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन सापडले ते धनंजय गावडे कोणत्या पक्षात आहेत? वाझेंबाबत पुरावे असताना त्यांना का पाठीशी घातले जात आहे? असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सचिन वाझेंचे निलंबन आणि अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis ठाम आहे. तसेच अधिवेशनापूर्वी सचिन वाझेंना Sachin Vaze आम्ही सोडणार नाही. त्यांच्याविरोधात विधान परिषदेत आज देखील आम्ही आवाज उठवणार, असा इशारा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे. तसेच सत्तापक्षाने अन्वय नाईक आणि खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शब्द का फिरवला?

सभागृहातील कोंडी फोडण्यासाठी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनातील बैठकीत वाझेंना निलंबित करण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता, परंतु नंतर कोणाचा दबाव आला, कोणाशी चर्चा झाली, त्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.

सत्य काय ते बाहेर येईलच- अनिल देशमख

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडून केला जात आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच, अशी ग्वाही मी देतो. विरोधकांकडे अधिकचे पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

वाझे यांचा जबाब नोंदवला

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास सुरू असून हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचाही जबाब एटीएसने नोंदविला आहे.

Web Title: Maharashtra Budget 2021: Today is the last day of the convention and the BJP will take an aggressive stance in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.