मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहे. यावेळी सरकारने विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात राज्याच्या जलसंपदा विभागाला भरीव निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. महिलांसाठी विशेष स्त्री रुग्णालय उभारण्यात येत आहे.
राज्यातील महिलांसाठी स्त्री रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये महिला व नवजात शिशूंसाठी स्त्री रुग्णालयांची उभारणी करण्यात येईल. त्यानुसार, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 10 खाटांची स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील गरिब रुग्णांना शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिपोस्केप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 2 वर्षात ही उपचारपद्धती सुरू करण्यात येईल. एकूण 60 रुग्णालयात ही उपचारद्धती सुरू करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.