Join us

Maharashtra Budget 2023: 'अजितदादा बोलतात गोड पण कार्यक्रम सुरू असतो'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 3:15 PM

Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे.

मुंबई- Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती, बारावी परीक्षेतील पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. 

'अजितदादा तुम्ही गोड बोलता पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. अशी पोटदुखी सुरू राहुदे, यासाठी आम्ही जालीम औषध ठेवले आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला. 

पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना

यावेळी अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार निशाणा साधला. "सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आम्हाला धक्का बसला राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले असंही अजितदादा भाषणात म्हणाले. पण, तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावली तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्यावर केली.  

"तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेता आहात का?, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. अजितदादा आता शिवसेनेचे प्रवक्तेही झाले आहेत. कडवट कट्टर तुम्ही बनू नका, अशी कोपरखळी शिंदेंनी लगावली.  (Maharashtra Budget 2023)

एकदा ठरवा मुख्यमंत्री कोण होणार

काही दिवसापूर्वी मुंबईसह पुण्यात बावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले होते, हे बॅनर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांचे लावले होते, यावरुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात टोले लगावले.  "जयंत पाटील आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले आहेत, ते अगोदर ठरवा कोण होणार मुख्यमंत्री. सगळ्या बॅनरची साईज सेमच आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. (Maharashtra Budget 2023)  

टॅग्स :एकनाथ शिंदेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनामहाराष्ट्र बजेट २०२२