Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. देशाच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असून, राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयांवर राज्याचा अर्थसंकल्प आधारित असून, या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारकडून अनेक बड्या घोषणा करण्यात आल्या.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर घालण्यात आली आहे. प्रतिशेतकरी प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ६ हजार असे १२ हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात आला असून, आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देण्यात येणार असून, या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च करणार येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून २ लाखांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करण्यात येणार आहे. शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत करण्यात येणार आहे. धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये देण्यात येणार असून, १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यांसह अनेक घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"